पालघर - जिल्ह्यात आजपासून कन्टेनमेंट झोन वगळून मद्य विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे, आज सकाळपासून मद्यप्रेमींची पालघर परिसरातील वाईन शॉप्स बाहेर एकच गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले. यावेळी वाईन शॉप्स बाहेर मद्यप्रेमींच्या लांब रांगा लागल्या होत्या. तसेच, मद्यप्रेमींकडून सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन होताना दिसून आले.
जवळपास दीड महिन्यापासून मद्य विक्री बंद असल्याने शहरातील मद्यप्रेमी हताश झाले होते. मात्र, राज्य शासनाने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात सेवांमध्ये थोडी शिथिलता दिली व राज्यातील रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये दारूची दुकाने उघडण्याची परवानगी दिली. या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यात वाईन शॉप्स उघडण्याची परवानगी देण्यात आली व दारूची दुकाने सुरू झालीत. मद्य विक्री पुन्हा सुरू झाल्याने मद्यप्रेमींनी सुटकेचा नि: श्वास सोडला आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांकडून दारू विक्रीबाबत आदेश न आल्याने काल जिल्ह्यातील वाईन शॉप्स बंद होते. त्यामुळे, काल सकाळी वाईन शॉप्सच्या बाहेर गर्दी केलेल्या तळीरामांची एकच निराशा झाली होती. आज दारू विक्रीदरम्यान परिसरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा- वसई-विरार शहरात दिवसभरात नवीन ३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह