पालघर - जिल्ह्याचे पालकमंत्री आपण आहात कुठे ? अशा आशयाचे बॅनर पालघरमध्ये झळकले आहेत. हे बॅनर भारतीय जनता पक्षाकडून लावण्यात आले आहेत. राज्याचे कृषीमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री दादा भुसे पालघरकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप भाजपाने केला आहे.
जिल्ह्यात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, तरीही पालकमंत्री याठिकाणी येत नाहीत. येथील परिस्थितीचा आढावा घेत नाहीत. 1 ऑगस्टला पालघर जिल्हा वर्धापनदिन आणि ९ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस होता. या दिवशी तरी पालकमंत्री जिल्ह्यात येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, पालकमंत्री याठिकाणी आलेच नाहीत. यावरुन पालघर जिल्हा कोणाच्या भरोशावर आहे? असा सवाल भाजपकडून उपस्थित करण्यात आला आहे. तर भाजपाकडून लावण्यात आलेले हे बॅनरही सध्या चर्चेचा विषय बनले आहे.
दरम्यान जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातही सध्या कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. दिवसाला सरासरी 150 ते 200 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. मंगळवारी वसई-विरारमध्ये एका दिवसात 137 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.