पालघर - राज्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पालघरमध्ये याची कडक अंमलबजावणी होताना दिसत आहे. ठिकाणी ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा व अत्यावश्यक कारणांशिवाय नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे. विकेंड लॉकडाऊनमुळे सध्या पालघरच्या रस्त्यांवर शुकशुकाट पहावयास मिळत आहे.
लॉकडाऊनला पालघरमध्ये चांगला प्रतिसाद..
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र दोन दिवसांचा विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात दोन दिवसांचा विकेंड लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पालघर, बोईसर, डहाणू सारख्या मोठ्या शहरात बाजारपेठा खाजगी दुकाने व आस्थापना पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी देखील विकेंड लॉकडाउनला चांगला प्रतिसाद दिला आहे.
पोलिसांचा चोख बंदोबस्त..
शहरातील तपासणी नाक्यांवर तसेच चौकाचौकात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठराविक येणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. दोन दिवसांचा विकेंड लॉकडाऊन असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन देखील पोलीस प्रशासनामार्फत नागरिकांना करण्यात येत आहे.