पालघर - वाडा तालुक्यातील वरसाले ग्रामपंचायत हद्दीतील नवापाडा येथील राही रघु किनर ही महिला काल(मंगळवारी) संध्याकाळच्या सुमारास पाणी काढताना तोल गेल्याने विहिरीत पडली होती. यामध्ये ती गंभीर जखमी याबाबत ईटीव्ही भारतने 'पाणी टंचाई जीवावर, विहिरीतून पाणी काढताना तोल गेल्याने महिला गंभीर' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशीत केले होते. त्याची दखल घेत आजपासून या गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. याबाबत गावच्या सरपंचांनी ईटीव्ही भारतचे आभार मानले.
ईटीव्ही भारतने प्रकाशित केलेले वृत्त वाचण्यासाठी इथं क्लिक करा
वाडा तालुक्यातील वरसाळे गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यातील नवापाडा या पाड्यातील एक महिला सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पाणी काढण्यासाठी खोलवर विहिरीत उतरली असता तिचा तोल गेला. यामध्ये तिच्या हाताला, कमरेला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तिला उपचारासाठी प्रथम वाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी तिला ठाणे येथे हलविण्यात आले.
पाणी टंचाई समस्येबाबत येथील सरपंच प्रकाश शेलार यांनी वाडा पंचायत समितीकडे टँकर पाणी प्रस्तावही पाठवला होता. मात्र, आठवडा उलटूनही याबाबत काही हालचाल झाली नव्हती. त्यात विहिरीतून पाणी काढणे या महिलेच्या जीवावर बेतले, असे सरपंच शेलार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले होते. याबद्दल ईटीव्ही भारतने आवाज उठविला आणि लगेच प्रशासकीय यंत्रणा जागी झाली. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला.