पालघर - वाडा तालुक्यातील गोऱ्हे-गालतरे रस्त्याचे काम संथगतीने सुरू झाल्यामुळे बससेवा बंद झाली आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून दररोज 4 ते 5 किलोमीटर पायी प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पालघर जिल्ह्यात थंडीची लाट आहे. विद्यार्थ्यांना रोजच पहाटेच्या सुमारास लवकर उठून बसविना थंडीत पायपीट करावी लागत आहे.
तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीचा असणारा वाडा-गोऱ्हे-गालतरे रस्त्यावर गोऱ्हे येथे काँक्रिटीकरणच्या कामाला एक महिना पूर्ण झाला आहे. संबंधित ठेकेदाराकडून पुढील कामात दिरंगाई होताना दिसत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रस्त्याचे काम चालू असताना कुठेही फलक लावण्यात आले नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, रस्त्याचे काम चालू असल्यामुळे गावातून बस जात नाही. त्यामुळे या मार्गावरील काही प्रवाशांना नाईलाजाने वाडा-मनोर मार्गावरील हमरापूर या लांब पल्ल्याच्या मार्गाने गालतरे, नाणे गावी ये-जा करावी लागते आहे. बस बंद झाल्याने प्रवाशी वर्गाला खासगी प्रवाशी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याचे काम व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.