पालघर - जिल्ह्यात आता सार्वजनिक ठिकाणी येताना सर्वांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क न घातलेल्या व्यक्तीला कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कोरोना विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी हे आदेश दिले आहेत.
सर्व जीवनावश्यक वस्तू व सेवा पुरवठा करणाऱ्या तसेच अत्यावश्यक कारणासाठी बाहेर पडलेल्या सर्व लोकांना हे आदेश लागू होणार आहेत. राज्यात लागू करण्यात आलेल्या 'साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७' नुसार या आदेशाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
'महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियम २०२०' अन्वये जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून हे आदेश काढण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी किमान अंतर ठेवण्यासोबतच सर्वांनी मास्क घालणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या परिपत्रकातून स्पष्ट केले आहे.