वसई - वसईच्या भुईगाव समुद्रकिनारी गुरूवारी दुपारी एक महाकाय संशयास्पद बोट आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ही बोट नेमकी कोणाची आहे किंवा त्यात असलेले नागरिक कोण आहेत याबाबतची माहिती अद्याप मिळाली नसल्याने किनारपट्टी परिसरासह वसई गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
- पोलिसांकडून तपास सुरू -
सदर बोटीची माहिती वसई पोलीस व फिशरिंग डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत सदर बोट कोणाची आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही बोट समुद्रकिनाऱ्यापासून दोन ते अडीच नोटिकल अंतरावर असल्याने काहीच माहिती मिळू शकली नाही. मात्र, दुर्बीनेने पाहणी केली असता या बोटीवर काही संशयास्पद नागरिक असल्याचे दिसून येत आहे. त्यांचा अधिक शोध घेण्यासाठी कोस्टल गार्डचे एअरक्राफ्ट समुद्रकिनाऱ्यावर फिरत आहे.
- पोलीस अधिकारी घटनास्थळी -
संध्याकाळ उशिरापर्यंत या बोटीचा किंवा त्यावर असलेल्या नागरिकांचा पत्ता लागलेला नाही. ही बोट ज्या परिसरात अडकली आहे तो भाग खडकाळ असल्याने बोट जागेवरून हलू शकत नाही. त्यामुळे हवाई दलाच्या विमानाच्या मदतीने संध्याकाळी उशिरापर्यंत प्रशासनाचे शोधकार्य सुरू ठेवल्याची माहिती वसई सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे यांनी दिली आहे.
हेही वाचा - मंत्रालयात झाले मोठे फेरबदल; एकाचवेळी ३०० अधिकाऱ्यांच्या बदल्या