पालघर - बहुजन विकास आघडी हा राजकीय पक्ष नसून एक कंपनी आहे. जमिनीतून एखाद्या घराला वाळवीची कीड लागते, तशी ही विरार-वसईला लागलेली किड आहे, अशी खोचक टीका शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. यावर उपाय म्हणून शिवसेनेला मतदान करून फवारा मारा आणि ही कीड पुर्णतः नष्ट करा, असे उद्धव ठाकरेंनी आवाहन केले आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिवसेना, भाजप, आरपीआय व श्रमजीवी संघटना महायुत्तीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आली. भर दुपारी रणरणत्या उन्हात दुपारी ३ वाजता पालघर येथील दांडेकर मैदानात या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
वर्षभरापूर्वी २५ मे २०१८ ला पालघर लोकसभा मतदारसंघात, याच मैदानातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला लक्ष्य करत त्यावेळचे भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांना पराभूत करण्याचे आवाहन केले होते. आज त्याच ठिकाणाहून उद्धव ठाकरेंना भाजपमधून शिवसेनेत आयात केलेल्या महायुतीचे पालघर लोकसभेचे उमेदवार राजेंद्र गावित यांना विजयी करा, असे आवाहन करण्याची वेळ आली.
पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीची गुंडगिरी असून त्यांची गुंडगिरी यावेळी मोडून काढू, अशा शब्दात ठाकरे यांनी हितेंद्र ठाकूर यांना धमकीवजा इशारा दिला. बहुजन विकास आघाडी ही सत्ता असेल त्याचे पाय चाटणारी संघटना आहे. त्यांच्यावर असलेल्या केसेस बाहेर येऊ नये, म्हणुन ते सत्ताधारी पक्षाला पाठिंबा देतात, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
जिल्ह्यात कुपोषणाबाबत होत असलेली हेळसांड, तसेच शेतकऱ्याच्या हमीभावाबद्दल, जिल्ह्यातील बेरोजगारांच्या समस्या, ग्रामीण दुर्गम भागात सर्वच तालुक्यात पिण्याच्या पाण्याची भयानक परिस्थिती असताना याबाबत ठाकरेंनी याचा आपल्या भाषणात उल्लेख केला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.