पालघर - महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे असताना अनेकांना कोरोनाचे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. कारण हातावर विलगीकरण अर्थात ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का असूनही अनेकजण सार्वजनिक ठिकाणी प्रवास करत असल्याचे दिसत आहे. धक्कादायक म्हणजे आज (शनिवार) सकाळीच दुबईहून मुंबईला आलेल्या दोघांनी क्वारंटाईनचा शिक्का असूनही रेल्वेने प्रवास केल्याचे समोर आले आहे. या दोन्ही प्रवाशांना विरारमध्ये उतरवण्यात आले.
हेही वाचा... जगात धुमाकूळ घालणारा 'कोरोना' आहे तरी काय..? जाणून घ्या उपाययोजना व लक्षणे
विरार स्टेशनवर उतरवण्यात आलेल्या दोन प्रवाशांमध्ये एक पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. हे दोघेही आज सकाळी दुबईहून मुंबईत आले होते. हे दोघेही रेल्वेने गुजरातला जात होते. ही महिला रिझर्वेशन डब्यात तर पुरुष जनरल डब्यातून प्रवास करत होता. या दोघांच्या हातावरील स्टॅम्प लक्षात आल्यावर अन्य प्रवाशांनी चेन खेचून त्यांना विरार स्टेशनवर उतरवले आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन, त्यांचे स्क्रीनिंग केले आहे. तसेच त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येत आहे.