पालघर/नालासोपारा - नालासोपारा पूर्वेकडील मोरेगाव येथे अंध व्यक्तीची हत्या करून फरार झालेल्या आरोपींना तुळींज पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी ललिता सुलपतबहार यांनी दिलेल्या तक्रारीवरून तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोणताही तांत्रिक पुरावा नसताना कौशल्यपूर्ण व अतिशय शीघ्र गतीने माहिती मिळवून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.
नालासोपारा येथे २८ जुलैला ११.३० वाजचाच्या सुमारास दिनेश हाटे (अंध व्यक्ती) व त्यांची पत्नी अनिता हाटे यांच्या घराबाहेर दोन अनोळखी व्यक्ती आरडाओरडा करून गोंधळ करत होत्या. त्यावेळी दिनेश हाटे यांनी दोन्ही व्यक्तींना शांत राहण्यास सांगितले. याचा मनात राग धरून त्यांनी दिनेश व त्यांची पत्नी यांना लाथाबुक्यांनी तसेच, ब्लेडने वार करत मारहाण केली.
या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर व उपविभागिय पोलीस अधिकारी, नालासोपारा अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शखाली तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप हंसकोटी यांनी गुन्हेगारांचा शोध लावला. कोणताही तांत्रिक पुरावा नसताना कौशल्यपूर्ण व अतिशय शीघ्र गतीने माहिती मिळवून पोलिसांनी आरोपी उमेश जोशी (वय २६), प्रदीप पानकर (वय २९ रा. कारगा नगर) यांना ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांना तुळींज पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.