पालघर - जिल्ह्यातील मोजक्या परंपरेतील सुमारे एकशे पंचावन्न वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा लाभलेल्या व वसई पूर्व परिसरात ख्यातनाम असलेल्या खानिवडे राम मंदिर जन्मोत्सव सोहळ्यात कोरोनामुळे खंड पडला आहे. १५७ व्या वर्षी ही परंपरा दुसऱ्यांदा खंडित झाली आहे. यामुळे श्रीराम नावमी उत्सव यात्रा, श्रीराम जन्म पालखी सोहळा रद्द करण्यात आल्याचे गाव उत्सव कमिटी कडून सांगण्यात आले आहे. याच प्रमाणे हनुमान जयंतीचे होणारे कार्यक्रम ही रद्द करण्यात आले आहेत. मात्र, याच बरोबर गाव परिसरातील भाविकांनी श्रीराम नवमी उत्सव शासनाचे निर्बंधित नियम पाळून आपल्या घरासमोर अथवा अंगणात फक्त घरातील एका व्यक्तीने पणती लावून व गुढी उभारून रामरक्षा स्रोताचे पठण करून साजरे करावा. पारी १२ . ४० मिनिटांनी रामजन्मोत्सवाच्या वेळी समस्त ग्रामस्थांनी आपल्या घरातच राहून आरती म्हणावी असे सूचित करण्यात आले आहे.
खानिवडयाचा हा उत्सव सोहळा परिसरात खूप महत्व पूर्ण मानला जात असून दरसाल परिसरातील नवसई, भाताणे, चांदीप, शिवणसई, उसगाव, शिरवली, माजीवली, पारोळ, खराटतारा, काशीद कोपर, भामटपाडा, विरार फाटा, कणेर, पेल्हार, खार्डी, कोशिंबे, शिरसाड, मांडवी, भालीवली, जांभूळ पाडा, थळ्याचा पाडा, सकवर, भारोळ, पाचरूखे, चिमणे, हेदवडे, उंबरपाडा व पालघर सह वसईच्या तालुक्यातील अनेक गावातील भाविक श्रीराम जन्मोत्सवास उपस्थित असतात. विशेष म्हणजे खानिवडे गावातील अनेक गावकरी कामधंद्या निमित्त वसई, मुंबई, ठाणे, पुणे येथे स्थायिक झालेत, ते आपल्या कुटुंबासह दोन दिवस श्रीराम जन्मोत्सवास येतात. मात्र, यंदा पुन्हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे १५६ वर्षांच्या उत्सवाची परंपरा दुसऱ्यांदा खंडित झाली आहे. मात्र, असे असले तरी शासनाचे नियम पाळून व केवळ पूजा करणाऱ्या एक दोन व्यक्तींच्या उपस्थितीत आज मंदिरात पहाटे पुरोहिताकडून पाद्य पूजा, अभ्यंग स्नान व श्रीराम , लक्ष्मण, जानकी, गणेश व हनुमान यांचा वस्त्रालंकार करण्यात येणार आहेत. भाविकांनी मात्र आपल्या घरातच सुरक्षितता म्हणून थांबून मंदिरात येऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
दरसाल हा उत्सव पुढील प्रमाणे साजरा करण्यात येतोय -
गुढीपाडव्या पासून नऊ दिवस पहाटे मंदिरात ग्रामस्थांकडून रामरक्षा स्रोत पठण केले जाते. नऊ दिवस येथे मंगलमय वातावरण असते. जन्मोत्सवदिनी रात्री साडेबारा वाजता राम घोषवारा व भजन गात संपूर्ण गावभर पालखी मिरवणूक काढली जाते. यासाठी गावातील महिलांचा मोठा पुढाकार असतो. गावातील महिला शेवटच्या दिवशी म्हणजेच नवमीचा धरलेला उपवास श्रीरामाची पालखी वाजत गाजत स्वतःच्या दारापर्यंत आल्यावर तिचे पूजन केल्यानंतर उपवास सोडतात. ही प्रथा येथे पारंपरिक आहे. मंदिर परिसरातील अनेक गावांमधले भाविक सुरवातीस पालखीला खांदा दिल्यानंतरच उपवास सोडतात. दोन वर्ष अगोदर हा उत्सव नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरात मोठ्या भक्तिभावाने व हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला होता.