पालघर - वसई-विरारसह मीरा भाईंदर परिसरातील लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या चार हजार आठशे हजार श्रमिक प्रवाशांसाठी उत्तरप्रदेशला जाणाऱ्या तीन विशेष ट्रेन आज बुधवारी वसई रेल्वे स्थानकातून रवाना झाल्या. दोन जौनपूर आणि एक वाराणसीला रेल्वे जाणार आहे. त्यानुसार अर्ज केलेल्या प्रवाशांना वसई पश्चिमेकडील सनसिटी मैदानात जमण्याचे आवाहन केल्याने या मैदानात भर उन्हात हजारो प्रवाशांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान या गर्दीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला.
मैदानातून रेल्वे स्थानकात जाण्यापूर्वी सर्व प्रवाशांचे मेडिकल स्क्रिनिंग करण्यात येत होते. त्यानंतर बसच्या मदतीने या प्रवाशांना रेल्वे स्थानकापर्यंत सोडण्यात आले. प्रत्येक ट्रेनमध्ये सोळाशे प्रवासी बसतील, अशी व्यवस्था करून वसईतून तीन ट्रेन उत्तरप्रदेशसाठी रवाना होत आहेत. वसई परिसरात आजही लॉकडाऊनमध्ये अनेक मजूर अडकून पडले असून, त्यांच्या खाण्या-पिण्याचे हाल होत असल्याने त्यांना आपल्या मायगावी परतण्याची ओढ लागली आहे. यात उत्तराखंड, बिहार, ओडिशा या ठिकाणच्या मजुरांचा समावेश आहे. त्यासाठी शासनाकडून युद्ध पातळीवर कार्य सुरू असून, यापुढे आणखी 8 ट्रेन सोडण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.