पालघर- जिल्ह्यात भूकंपाचे प्रमाण वाढले आहे. यात नागरिकांच्या घरांची पडझड झाली आहे. भूकंपामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. अशात डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद निकोले यांनी नुकसान झालेल्या घारांची पाहणी केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्य मंत्रालय भूकंप व पुनर्वसन मंत्री, राज्यमंत्री, प्रधान सचिव यांना ई-मेलद्वारे पत्र पाठवून ५ कोटीची मागणी केली आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी भूकंपग्रस्तांना कोणतीही कमतरता भासू देणार नाही, असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार विनोद निकोले यांनी सांगितले. त्यांनी डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी, पुंजावे, चिंचले येथील भूकंपग्रस्त घरांची पाहणी केली. यावेळी त्यांनी भूकंपग्रस्त बाधितांना मदत म्हणून अन्नधान्याचे वाटप देखील केले. तसेच, त्यांना धीर देत लवकरात लवकर शासनाकडून नुकसान भरपाई, टेन्टची संख्या वाढवणे, तसेच इतर समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले. पालघर जिल्हा हा आदिवासी बहूल भाग आहे. त्यातील डहाणू व तलासरी तालुक्यातील अतिदुर्गम भागात सतत भूकंपाचे धक्के होत असतात. भूकंपाची तीव्रता ही ३.५ पेक्षा अधिक व त्या दरम्यान आहे. परिणामी, गोरगरीब आदिवासींच्या घरांना तडे गेले आहेत, तर अनेक जण पूर्णतः बेघर झाले आहेत.

भूकंपामुळे संपूर्ण जिल्हा भीतीच्या छायेखाली वावरत आहे. त्यातच कोरोनामुळे आदिवासी बंधू-भगिनी दुहेरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे, राज्य सरकारकडूनही मदतीची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी तालुक्यातील भूकंपग्रस्तांसाठी मदत निधी देवून भूकंप व पुनर्वसन मंत्र्यांनी या भागांची पाहणी करावी, अशी मागणी आमदार निकोले यांनी केली आहे. तसेच, डहाणू व तलासरी येथील तहसीलदार यांना भूकंपग्रस्त भागांचे पंचनामे करण्याच्या सूचना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी चंद्रकांत गोरखना, डॉ. आदित्य अहिरे, ग्रामस्थ, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा- पालघर- डहाणू व तलासरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणते.