वसई-विरार (पालघर) - वसई विरारमध्ये कोरोनाचा प्रसार वाढत आहे. दिवसाला सरासरी 150 ते 200 नवे कोरोनाबाधित आढळत आहेत. तसेच रविवारी वसई - विरारमध्ये एका दिवसात 211 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
रविवारी दिवसभरात उपचारादरम्यान कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. 142 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 211 रुग्ण वाढल्यामुळे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 6 हजार 170 वर जाऊन पोहचली आहे.
वसई विरारमध्ये आतापर्यंत एकूण 126 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. पालिका क्षेत्रात आतापर्यंत 2 हजार 810 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 3 हजार 243 कोरोनाबाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
देशात कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. त्यात दिवसेंदिवस झपाट्याने वाढही होत आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे राज्य सरकारने लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवला आहे. अनलॉक-1 प्रमाणेच अनलॉक-2 मध्येही काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे.