पालघर - खाद्य तेलाची उत्पादकता वाढविण्यासाठी पालघर जिल्ह्यात शेतकरी सध्या तीळ, सुर्यफुलाची लागवड करताना दिसत आहेत. या पिकातून खाद्य तेलाची निर्मिती होत असल्याने, पिकाला दर देखील चांगाला मिळतो. कमी खर्चातून जास्त उत्पादन मिळत असल्याने शेतकरी भाजीपाल्यासोबतच तेलबियांचे उत्पादन घेत आहेत.
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील बिलोशी गावातील जगदीश एकनाथ पाटील या शेतक-याने पाच हजार रुपये खर्च करुन पाऊण एकरात सुर्यफुलाची लागवड केली आहे. या सुर्यफूलाच्या लागवडीतून 50 हजारांचा नफा मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, या भागात सुर्यफूलाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. या दोन तालुक्यात मिळून 200 हेक्टरपेक्षाही अधिक क्षेत्रामध्ये सुर्यफूलाची लागवड करण्यात आली आहे. तर पालघर तालुक्यात तिळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते, तालुक्यात तब्बल 400 हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी तिळाची लागवड केल्याची माहिती जिल्हा कृषी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या सुर्यफुलाची लागवड
पालघर जिल्ह्यातील बिलोशी गावातील जगदीश पाटील हे दरवर्षी आपल्या 35 गुंठयात चवळी, भेंडी, गवार, मिरची, टोमॅटो या
भाजीपाला पिकाची लागवड करत होते. यावर्षी त्यांनी सुर्यफूलाची लागवड केली आहे. सुर्यफुलाची लागवड करण्यासाठी त्यांना एकूण 5 हजारांचा खर्च आला. जगदीश पाटील हे अपंग असले तरी त्यांनी यावर मात करत पत्नीच्या मदतीने शेतात सुर्यफूलाची लागवड केली आहे. या पिकासाठी त्यांनी सेंद्रिय खताचा वापर केला असून, त्यांची सुर्यफुलाची शेती पाहाण्यासाठी परिसरातील शेतकरी येत असल्याची माहिती त्यांनी दिली.