पालघर - वीज बील थकल्यामुळे कुडूसच्या टेलिफोन कार्यालयाचे वीज कनेक्शन महावितरण विभागाने तोडले आहे. त्यामुळे, बीएसएनएलवर चालणारी इंटरनेट सेवा खंडित झाली आहे. याचा फटका व्यापारी वर्गाला तसेच, इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या केंद्रांनाही बसला आहे.
पालघरच्या वाडा तालुक्यातील कुडूस येथे वीज महावितरण कार्यालयाजवळ दूरसंचार निगम कार्यालय आहे. 21 ऑगस्टला सायंकाळी टेलिफोन कार्यालयाचे 2 लाखांहून अधिक रुपयाचे वीज बील न भरले गेल्याने, या कार्यालयाचे वीज कनेक्शन तोडण्यात आल्याचे माहिती मिळत आहे. यावर टेलिफोन कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.
या खंडित सेवेमुळे व्यापारी वर्गाला बिल बनविणे, जीएसटी भरणे तसेच करासंबंधी कामे करणे अवघड बनले आहे. ही सुविधा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी कुडूस व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हर्षल देसले यांनी केली आहे.