पालघर - तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपींवर तलासरी पोलिसांनी आमगाव ब्रिज येथे कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ९३ हजार ६०० रुपये किमतीचे तंबाखूजन्य पदार्थ व कार असा एकूण ७ लाख ९३ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कारमधून केली जात होती तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आमगाव ब्रिज परिसरात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्या संशयित वाहनांची तपासणी तलासरी पोलीस करत होते. कार क्रमांक एम. एच.०५ डी. एच. ९५८१ची पोलिसांनी तपासणी केली असता, पोलिसांना त्यात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या कारमधील मधील १ लाख ९३ हजार ६०० रुपये किमतीचे तंबाखूजन्य पदार्थ व ६ लाख रुपये किमतीची कार असा एकूण ७ लाख ९३ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तीन आरोपींना अटक
तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी तलासरी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपीविरोधात तलासरी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२८,२७२, २७३, १८८, ३४ सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.