विरार - अमेरिकेची पदवी घेतलेल्या मानसउपचारतज्ज्ञ डॉक्टरने एका रुग्णावर उपचार करण्यासाठी ५ विस्की आणि १० बिअर असा मद्याचा उपचार सांगितला आहे. तसेच तिला महिनाभर एका प्रियकराच्या जवळ ठेवा असेही सांगितले आहे. या उपचार काहीतरी गौडबंगाल असल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी अर्नाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली. यावेळी या कुटुंबीयांना डॉक्टरने ९ लाखाचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अर्नाळा पोलिसांनी या डॉक्टरच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मुलीवर उपचारासाठी मागितले 5 लाख रुपये -
अर्नाळा पोलिसांनी माहिती दिली की, हैदराबाद येथे राहणारे किरण कुमार वंगला (४७) हे एका महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. त्यांची मुलगी छीन्नमनस्कता (स्किझोफ्रेनिया) या आजाराने ग्रासली आहे. तिच्यावर हैदराबाद येथे एका तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचार सुरु आहेत. पण तिला आराम येत नव्हता. दरम्यान वंगला यांच्या पत्नीने युट्यूबवर विरार येथील डॉ. कैलाश मंत्री यांचे व्हिडिओ पहिले. त्यात त्यांनी ऑनलाइन पद्धतीने हा आजार १० दिवसात बरे करण्याचा दावा केला होता. त्याच्या या प्रलोभनाला बळी पडत वंगला यांच्या पत्नीने मंत्री यांच्याशी संपर्क साधला. यावेळी मंत्री यांनी उपचाराचे ५ लाख रुपये सांगितले आणि मुली बरोबर घरच्या मंडळीचा सुद्धा उपचार करावा लागेल असे त्याने सांगितले. सांगितल्यानुसार वंगला कुटुबीयांनी मंत्री याला पैसे पाठविले आणि त्याने सांगितलेल्या पद्धतीने उपचार घेतले. पण वंगला यांच्या मुलीत कोणतीही सुधारणा झाली नाही. यावेळी त्यांनी पुन्हा मंत्री यांच्याशी संपर्क साधला आणि मुलीत कोणतीही सुधारणा होत नसल्याचे सांगितले. यावेळी मंत्री याने त्यांना मुंबईला येवून भेटण्यास सांगितले.
अजब उपचाराचा दिला सल्ला -
मंत्री याने वंगला यांना विमानतळावर घेण्यासाठी गाडी पाठवली, यावेळी त्याने उपचारासाठी ५ विस्की आणि १० बिअर आणि ३ लाख रुपये घेवून येण्यासाठी सांगितले, वंगला यांनी पुन्हा पैसे आणि दारू दिली. जेव्हा ते डॉक्टर मंत्री याला विरार येथील बोळींज परिसरातील दवाखान्यात भेटले. तेव्हा त्याने अजब उपचार सांगितले, त्याने सांगितले की तुमच्या मुलीला भरपूर दारू पाजा आणि तिला महिनाभर एका प्रियकराच्या जवळ ठेवा. वंगला यांना हे उपचार पटले नाही आणि त्यांनी अर्नाळा पोलीस ठाण्यात डॉक्टरच्या विरोधात तक्रार नोंदविली.
9 लाखांची केली फसवणूक -
अर्नाळा पोलिसांनी डॉक्टर कैलाश मंत्री याची चौकशी केली असता त्याने ऑनलाईन पद्धतीने अमेरिकेतील एका विद्यापीठातून मानसउपचार तज्ज्ञाची पदवी घेल्याचे आढळून आले. ही पदवी बनावट असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे त्यांच्या पदवीची तपासणी पोलीस करत आहेत. सध्या त्याच्या विरोधात ९ लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा अर्नाळा पोलिसांनी दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी दिली आहे.
हेही वाचा - चक्क 10 कोटी रुपयाला विकले एक रुपयाचे नाणे