पालघर - विरार पश्चिम येथील अर्नाळा परिसरात सर्पमित्रांनी वाचवलेल्या एका डुरक्या घोणस प्रजातीच्या सापाने ७ पिल्लांना जन्म दिला आहे. यातील ५ पिल्ले जीवंत असून २ मृत अवस्थेत होती. या मादी डुरक्या घोणस सापासह पिल्लांना त्यांच्या अधिवासात सुरक्षित सोडले जाणार आहे.
विरार पश्चिम येथील अर्नाळा परिसरात साप आढळल्याची माहिती सर्पमित्रांना देण्यात आली होती. माहिती मिळताच सर्पमित्र सागर तरे व सुरज पांडे यांनी त्याठिकाणी जाऊन सापाला पकडले. हा साप मादी जातीचा असल्याचे लक्षात आले. सापाला पकडून एका गोणीत ठेवले असता त्यातच या डुरक्या घोणस नावाच्या मादी सापाने ७ पिल्लांना जन्म दिला आहे. त्यातील ५ पिल्ले जिवंत होती तर दोन पिल्ले मृत अवस्थेत होती. वनविभागाच्या मदतीने या घोणससह पिल्लांना जंगलात सुखरूप सोडून देण्यात आले आहे.
पावसाचे दिवस सुरू झाल्याने आजूबाजूच्या परिसरात हे साप दिसतात. या सापांना न मारता सर्पमित्र किंवा अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात यावी, असे आवाहन यावेळी सर्पमित्रांनी केले आहे.