पालघर- डहाणू उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत दमन बनावटीची लाखो रुपयांची दारू जप्त केली आहे. तसेच गावठी दारू बनविण्यासाठी वापरण्यात येणारा काळा गुळ आणि नवसागर ताब्यात घेतला आहे. या दारूची वाहतूक करणारी तीन वाहने उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतली आहेत. तसेच अपंगांसाठी वापरण्यात येणाऱ्या तीन चाकी सायकलचाही वापर या दारू तस्करीसाठी केला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
आशागड पोलीस चौकीजवळ नरेश पुनमचंद सारस्वत उर्फ नरेश महाराज यांच्या घरात गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारा काळा गूळ आणि नवसागर असा तब्बल 3000 किलोचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चार व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मागील दोन दिवसात डहाणू उत्पादन शुल्क विभागाने तब्बल सहा लाख 19 हजार 240 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.