पालघर - बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी सळईंना घेऊन जाणाऱ्या ट्रेलरला अडवून चालकाला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत सळ्यांच्या मालावर दरोडा टाकणाऱ्या ६ आरोपींच्या पालघर दहशतवाद विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना आज(गुरुवार) वाडा न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना पोलीस कोठडी ठोठावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जिल्ह्यातील वाडा तालुक्यात ११ फेब्रुवारीला रात्री ११ च्या सुमारास वाडा-भिवंडी महामार्गवरील खुपरी येथे एका कारमधील अज्ञात आरोपींनी लोखंडी सळईन भरलेल्या मालवाहू ट्रेलर अडवला. चालकाला रिव्हॉल्वरचा धाक दाखवून या ट्रेलरचे अपहरण करत लोखंडी सळया घेऊन पोबारा केला होता. या गुन्ह्याचा तपास चालू असताना ही तपासाची मोहीम पालघर दहशतवाद विरोधी पथकाचे मानसिंग पाटील व त्यांच्या टीमने घेतली.
हेही वाचा - जिल्हा परिषदेवर महाविकासआघाडीची सत्ता; अध्यक्षपदी भारती कामडी, तर उपाध्यक्षपदावर निलेश सांबरेंची वर्णी
या गुन्ह्यातील सहाही आरोपींना पकडण्यात आले आहे. या गुन्ह्यातील आरोपी हे ३० वर्षे वयोगटातील असुन उच्चशिक्षित असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी करत आहेत.
हेही वाचा - परिचर घोटाळ्यातील तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला अटक