पालघर - जिल्ह्यातील ग्रामीण भागात ६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. प्राप्त झालेल्या अहवालानुसार या ६ नव्या रुग्णांमध्ये पालघर तालुक्यातील ५ आणि वसई ग्रामीण मधील एका रुग्णांचा समावेश आहे. पालघर जिल्हा ग्रामीणमध्ये कोरोनाबधित रुग्णांची संख्या ९० झाली असून आतापर्यंत ४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ३ रुग्णांचा मृत्यू झाला असून ४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पालघर तालुक्यात चोवीस तासात ५ कोरोनाबाधित आढळून आले असून, यात बोईसर परिसरातील चार व पालघर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. बोईसर, नवापूर नाका येथील एका ५ वर्षीय मुलीला, ३५ वर्षीय व ६७ वर्षीय दोन महिलांना कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांची चाचणी केली असता, त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तसेच बोईसर- नवापुर नाका येथील ४१ वर्षीय व्यक्तीमध्ये SARI/ILI लक्षणे आढळल्याने सदर व्यक्तीची कोरोना चाचणी केली असता कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला.
पालघर नगरपरिषद हद्दीतील विष्णूनगर येथील ३९ वर्षीय पालघर ग्रामीण रुग्णालय येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम विभागात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. या रुग्णामध्ये SARI /ILI लक्षणे आढळून आल्याने कोरोना चाचणी केली असता पॉझिटिव्ह आढळून आला. वसई ग्रामीणमध्ये एक नवीन रुग्ण आढळला असून, वसई तालुक्यातील रानगाव, हनुमान आळी येथील मुंबई पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या ३३ वर्षीय महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.