पालघर - लॉकडाऊन कालावधीमध्ये सर्वकाही बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे उत्पन्नाचे साधन बंद होते. मात्र तरीही महावितरण कंपनीकडून नागरिकांना एप्रिल व मे या तीन महिन्यांचे वीज बिल अवास्तव वाढीव वीज बिल देण्यात आले आहे. या वाढीव वीज बिलांबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी असून वीज बिलात तात्काळ कपात करुन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा. या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेतर्फे पालघर येथील महावितरण कार्यालयासमोर नियमांचे पालन करत धरणे आंदोलन करण्यात आले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. सर्व उद्योगधंदे बंद असल्याने सर्वसामान्य नागरिक, कामगार, खासगी नोकरदार व लहान उद्योग-धंदा करणारे व्यापारी घरी बसले. लॉकडाऊन काळात सर्व काही बंद असल्याने अशा परिस्थितीत उत्पन्नाचे कोणतेही स्त्रोत नसल्याने सामान्य नागरिकांचे उपासमारीने हाल झाले आहेत. असे असताना सर्वसामान्य नागरिकांना वीज वितरण कंपनीमार्फत मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांचे अवास्तव वीज बिल आले असून याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे या अवास्तव व वाढीव वीज बिलात तात्काळ कपात करण्यात यावी, अशी मागणी श्रमजीवी संघटननेने केली आहे.
प्रमुख मागण्या
1. वीज बिलामध्ये तात्काळ कपात करावी.
2. खराब झालेले विजेचे खांब तात्काळ बदलून द्यावेत.
3. गाव-पाड्यांमध्ये तात्काळ खांब टाकून वीज जोडणी करून द्यावी.
4 खराब झालेले वीज मीटर तात्काळ बदलून द्यावेत.