पालघर- शिवसेनेच्या 'माऊली संवाद' उपक्रमाची सुरुवात जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील बोर्डी येथून झाली. या उपक्रमांतर्गत आदेश बांदेकर हे राज्यभर दौरा करून समाजतील सर्व घटकांशी संवाद साधणार आहेत.
आदेश बांदेकर यांनी शुक्रवारी बोर्डी येथे शेतकरी, कष्टकरी आणि समाजातील सर्वच घटकांतील महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महिलांचे प्रश्न आणि समस्या जाणून घेतल्या. लवकरात लवकर हे प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन यावेळी शिवसेनेच्यावतीने त्यांनी दिले. पालघर जिल्हा निर्माण होऊन पाच वर्षे झाली तरीही जिल्ह्याचा विकास हवा तसा झाला नाही. रस्ते, आरोग्य, शिक्षण, रोजगार या प्रमुख विषयांवर पालघरमधील महिलांनी शिवेसेनेचे सचिव आदेश बांदेकर आणि आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले.
महिला मतदारांची संख्या एकूण मतदारांपैकी पन्नास टक्क्यांच्या जवळपास आहे. त्यामुळे या मोठ्या मतदार वर्गाला आकर्षित करण्यासाठी, शिवसेनेने आदेश बांदेकर यांचा चेहरा महाराष्ट्राच्या निवडणूक मैदानात उतरवला आहे.