वसई (पालघर) वसई, विरार महापालिका क्षेत्रात आज तब्बल 9 महिन्यानंतर शाळा सुरू झाल्या आहेत. 9 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी परवानगी दिली होती. आयुक्तांच्या परवानगीनंतर आज शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
२३ नोव्हेंबरपासून राज्य शासनाने इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली होती. परंतु पालघर जिल्ह्यासह वसई विरार शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हाधिकाऱ्यांनी पालघर जिल्ह्यातील पाच हजार लोकसंख्येपेक्षा कमी गावांमध्ये शाळा सुरू करण्याचे आदेश १ डिसेंबरला दिले, तर महापालिका क्षेत्रातील शाळा अद्यापपर्यंत बंदच होत्या, आज अखेर या शाळांना सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्याने शाळा सुरू झाल्या आहेत.
कोरोनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक
आजपासून वसई, विरार महापालिका क्षेत्रात शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेत येताना विद्यार्थी तसेच शिक्षकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. शिक्षकांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. कोरोना चाचणीचा अहवाल शिक्षक विभागाला प्राप्त झाल्यानंतरच त्या शिक्षकाला विद्यार्थ्यांना शिकवण्याची परवानगी देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना योग्य सुरक्षीत अंतर ठेवण्याच्या तसेच मस्क घालण्याच्या सूचना शाळेच्या वतीने देण्यात आल्या आहेत.