पालघर - सुरुवातीला शहरी भागात असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आता ग्रामीण भागापर्यंत पोहचला आहे. पालघरच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या सातपाटी गावात आत्तापर्यंत 29 जणांना कोरोनाची लागण झाली असून एक रुग्णाने कोरोनावर मात केली आहे. या परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असून यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सातपाटी ग्रामपंचायती अंतर्गत येणारी सर्व गावे व पाडे प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत.
पालघर तालुक्यातील सातपाटी ग्रामपंचायत प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व परिसर बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत. पेट्रोल पंप चालकांना देखील अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवेतील आस्थापनांची वाहने वगळता सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. मत्स्य विक्री केंद्रे आणि मत्स्य बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.