पालघर - बोईसर येथील राम मंदिरात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे संभाजी भिडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. मात्र, संभाजी भिडे यांच्या व्याख्यानाला बहुजनवादी आंबेडकरी संघटनांनी व पक्षांनी एकत्रित येऊन प्रखर विरोध दर्शवून हा कार्यक्रम रद्द पाडण्यास भाग पाडले.
हेही वाचा - ...तर पंतप्रधानांना पाय उतार व्हावे लागेल - नवाब मलिक
बोईसर येथील राम मंदिरात रविवारी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेतर्फे संभाजी भिडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. संभाजी भिडे यांचा कार्यक्रम होणार असल्याचे समजताच पालघर जिल्ह्यातील बहुजन समाज एकवटला. त्यानंतर त्यांनी या कार्यक्रमाच्या निषेधाचे निवेदन बोईसर पोलीस ठाण्यात दिले. त्यानंतर सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये व संघर्षाची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा याठिकाणी तैनात करण्यात आला.
संभाजी भिडे यांचा कार्यक्रम असलेल्या ठिकाणी दलित पँथर, रिपाई(A), बहुजन समाज पक्ष, बहुजन क्रांती मोर्चा, वंचित बहुजन आघाडी व बहुजन समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. तसेच त्यांनी संभाजी भिडे यांच्याविरोधात घोषणाबाजी करत या कार्यक्रमाला विरोध दर्शवला व हे व्याख्यान रद्द करण्याची मागणी केली.
हेही वाचा - ठाकरे-मुंडे संबंध पूर्वीपासून चांगले, मातोश्रीच्या संपर्कात सर्वच - अनिल परब
वाढता विरोध पाहता शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते व आंबेडकरवादी कार्यकर्त्यांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी आयोजक व बहुजन नेत्यांची एकत्रित बैठक बोलावली. त्यानंतर हा कार्यक्रम रद्द करण्याच्या मागणीवर अडलेल्या बहुजन नेत्यांच्या मागणीनंतर संभाजी भिडे यांचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर संभाजी भिडे यांना व्याख्यान न देताच कार्यक्रम स्थळावरून परतावे लागले.