पालघर - करोनाच्या पार्श्वभूमीवर मिठागर बंद असले तरीही जिल्ह्यातील मिठागरात मोठय़ा प्रमाणात मीठ तयार झाले आहे. लॉकडाऊनमुळे हे तयार झालेले मीठ उचलण्यासाठी मजूर मिळेनासे झाल्याने उत्पादक अडचणीत आले आहेत. त्यामुळे शासनाने मीठ उत्पादन व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी मीठ उत्पादकांनी केली आहे.
पालघर जिल्ह्यातील मिठागरात काम करण्यासाठी दरवर्षी ग्रामीण भागातील मजूर येतात. त्यांच्यामार्फत मिठागरात पाणी सोडणे, मीठ खेचणे, योग्य मशागत करणे, तयार झालेले मीठ उचलणे अशी कामे केली जातात. मात्र, सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू असून तयार मीठ उचलण्यासाठी लगणारे मजूर मिळेनासे झाले आहेत. संपूर्ण जिल्ह्यातील मिठागरांमध्ये हजारो एकरवर मीठ तयार असून मजूर मिळाले नाही, तर मशागत केलेले मीठ पाण्यात मिसळून प्रचंड नुकसान होण्याची भीती मीठ उत्पादकांना आहे.
शासनाने नियमानुसार काम करण्यास परवानगी दिली, तर तयार झालेले मीठ उचलता येईल. हे मीठ आवश्यक तेथे पाठवण्यास मदत होईल आणि नुकसान टळेल. अन्यथा दीड महिन्याच्या शिल्लक कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून मीठ उत्पादनास परवानगी द्यावी, अशी विनंती मीठ उत्पादकांनी शासनाकडे केली आहे.