पालघर/विरार - विरार-पश्चिम येथील ग्लोबल सिटीच्या ५२५ एकर जागेत १५ हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. मेसर्स पालघर लॅंड डेव्हल्पर्सचे भागीदार राकेशकुमार वाधवान आणि पीएमसी बँकेचे माजी अध्यक्ष वरयाम सिंग अरोरा आणि इतरांनी हा आर्थिक गैरव्यवहार केला आहे, असा आरोप आगरी सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष कैलास हरी पाटील यांनी केला आहे.
८८७ शेतकऱ्यांची मिळकत हडपण्यात प्रकार-
विरार-पश्चिम येथील ग्लोबल सिटीच्या ५२५ एकर जागेत ३६५ इमारतींची मोठी टाऊनशिप साकारली गेली आहे. मात्र ही टाऊनशिप साकारताना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविलेले कॉंग्रेस दिवंगत नेते भाऊसाहेब वर्तक आणि कुटुंबीय यांच्या जमिनीचा यात समावेश आहे. यासह अन्य ८८७ शेतकऱ्यांची गाव मौजे डोंगरे येथील जमीन मिळकत हडपण्यासाठी मेसर्स पालघर लॅंड डेव्हल्पर्सचे भागीदार राकेशकुमार वाधवान आणि पीएमसी बँकेचे माजी अध्यक्ष वरयाम सिंग अरोरा यांनी हा आर्थिक गैरव्यवहार केला आहे. आगरी सेनेचे कैलास पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन या गैरव्यवाहाराचे आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी भाऊसाहेब वर्तक तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग राज्यमंत्री दिवंगत तारामाई वर्तक व त्यांच्या कुटुंबीयांच्या झालेल्या फ़सवणुकीची कागदपत्रे सादर केली.
बनावट अंगठ्याचा ठसा; खोटे कुलमुखत्यार पत्र-
वर्तक व त्यांचे कुटुंबीयांची मौजे डोंगरे गाव येथे ९० हजार स्क्वेअर फूट जागा व १७ एकर जमीन आहे. ही जमीन मिळकत हडपण्यासाठी भाऊसाहेब वर्तक यांच्या निधनानंतर ६ वर्षांनी त्यांच्याच नावाने तोतया इसमास उभे करून त्यांचे खोटे फोटो व बनावट अंगठ्याचा वापर करण्यात आला. त्याआधारे खोटे कुलमुखत्यारपत्र बनवले गेले, असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. याशिवाय इतर ८८७ शेतकरी कुटुंबीयांच्या मिळकती मे. पालघर लॅड डेव्हलपर्सचे भागीदार राकेशकुमार वाधवान, पीएमसी (P.M.C) बँकेचे माजी चेअरमन वरयाम सिंग अरोरा व त्यांच्या इतर भागीदारांनी हडपल्या आहेत. या ५२५ एकर जागेवर ग्लोबल सिटी ही टाऊनशीप उभारण्यात आली आहे. यात अंदाजित १५ हजार कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला असल्याचा कैलास पाटील यांचा आरोप आहे.
कागदपत्रे केली सादर-
या गैरव्यवहारात तत्कालीन सिडको कार्यालयातून प्राप्त केलेला २००४ रोजीचा अकृषिक ना हरकत दाखला, जिल्हाधिकारी ठाणे कार्यालयातून प्राप्त केलेली अकृषिक परवानगी व विकास वर्तक यांच्या नावे तोतया उभ्या केलेल्या व्यक्तीच्या नावे सादर केलेले मुख्त्यारपत्रदेखील कैलास पाटील यांनी या पत्रकार परिषदेत सादर केले. या जागेवर मे. एवरशाईन व रुस्तोमजी बिल्डर्स यांना दिलेल्या सर्व बांधकाम परवानग्या, सुधारित बांधकाम परवानग्या व सर्व भोगवटा प्रमाणपत्रे तात्काळ रद्द करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी आगरी सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष कैलास हरी पाटील यांच्या वतीने शासनाकडे केली असल्याचे सांगितले.