पालघर/विरार - लॉकडाऊनच्या काळात तळीरामांनी दारूची दुकाने, वाइनशॉप फोडल्याच्या घटना समोर येत असताना आता विरारमध्ये 'तलपबाजांनी' चक्क पानटपरीवर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
विरार पूर्वेकडील चंदनसार रोडवर असलेल्या सिटी बार बाहेरील पानटपरी चोरट्यांनी फोडून त्यातील सिगरेट, बिडी, तंबाखू, गुटका व चुन्याच्या ट्यूब असा एकूण पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. चोरी करताना बारच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसू नये, यासाठी या चोरट्यांनी कॅमेऱ्याववर कागद चिटकवून मोठ्या शिताफीने माल लंपास केला. महत्त्वाचं म्हणजे या तलपबाजांनी पान टपरीमधील सिगरेट, बिडी, तंबाखू, गुटका व चुन्याच्या ट्यूब वगळता इतर कोणत्याही मालाची चोरी केली नाही. मात्र या चोरट्यांनी सिगरेट ठेवलेल्या जागेवर दुकान मालकासाठी फक्त एक सिगरेट ठेवून २० ते २४ सिगरेटचे बॉक्स लंपास केले.
टपरी मालकाने दिलेल्या तक्रारीवरून याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात तलपबाजांचे हाल होत आहेत शिवाय तंबाखूजन्य पदार्थांची विक्री लॉकडाऊनच्या काळात चढ्या भावाने होत असल्याने आता चोरीच्या घटनाही समोर येऊ लागल्या आहेत.