पालघर - निसर्गाला त्याचा समतोल साधण्यासाठी वेळ द्या. जैवविविधतेचे रक्षण आणि संवर्धन करा. माणसाला माणुसकीने वागणूक द्या, घोषवाक्याने आज (ता.5 जुन) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील गाव-पाड्यात निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी भारताचा क्रांतिकारी मार्क्सवादी पक्षाकडून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. आजच्या या पर्यावरण दिनानिमित या भागात स्वयंस्फुर्तीने सहभागी नागरिकांसह स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
हेही वाचा... पर्यावरण दिन विशेष: 'हत्तीणीचा जीव गेला.. वाघांना त्यापेक्षा क्रुरतेने मारले जायचे'
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात पक्षाकडून चिंचपाडा, आंबेपाडा, मांडवा, खुपरी आणि ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरीसह इतर भागात हा उपक्रम राबवण्यात आला. त्याचबरोबर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आजच्या या कार्यक्रमात फिजिकल डिस्टन्सिंग पाळत पक्ष कार्यकर्त्यांसह नागरिकांनी 'निसर्ग संवर्धनाची प्रतिज्ञा' घेतली.
दिवसभरात स्वच्छता मोहिमेसोबत काही ठिकाणी झाडेही लावण्यात आली. ग्रामीण भागातील आदिवासी समाजातील महिला वर्ग या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाला होता, अशी माहिती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बळीराम चौधरी यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना दिली.
निसर्गाचा समतोल साधण्यासाठी निसर्गाला वेळ द्या, असेही घोषवाक्य जनतेच्या मनात रुजवण्यात आले. जंगल भागात होणारी बेसुमार जंगल तोड ही पर्यावरणाला बाधक आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडतोय, असे मार्गदर्शन बळीराम चौधरी यांनी यावेळी केले.