पालघर - गडचिंचले प्रकरणातील वाडा पोलीस ठाण्यातील कोरोनाग्रस्त आरोपीच्या संपर्कातील 19 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती वाडा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रदीप जाधव यांनी दिली आहे. तसेच काही जणांचे अहवाल येणे बाकी असल्याचे जाधव म्हणाले.
पालघर जिल्ह्यातील वाडा पोलीस ठाण्यात गडचिंचले प्रकरणातील काही आरोपी हे वाडा पोलीस ठाण्यातील एका कोठडीत ठेवण्यात आले होते. यातील एका आरोपीला कोरोनाची लागण झाली होती. त्याला उपचारासाठी पालघर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्याच्या सहवासातील पोलीस आणि आरोपी असे एकूण 68 जनाचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. आज यातील काही जणांचे रिपोर्ट आले. कोरोनाबाधित आरोपीच्या संपर्कातील काही जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.
55 वर्षीय आरोपीला कोरोनाची झाली होती. तसेच वाडा तालुक्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह नव्हता त्यामुळे येथे चिंतेत भर पडली होती. या प्रकरणात 45 पोलीस कर्मचारी आणि 23 आरोपी असे एकूण 68 जणांचे स्वॅब घेण्यात आले. 19 जणांना क्वारंटाईन करण्यात आले. तसेच 7 मे पर्यंत वाडा शहर बंद ठेवण्याची कार्यवाही इथल्या प्रशासनाने हाती घेतली होती. कोरोनाबाधित आरोपीच्या अती संपर्कातील लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.