पालघर- देशभरात आज बकरी ईद साजरी करण्यात येत आहे. मिरारोड येथील जामा मशीदमध्येही आज मुस्लीम बांधवांनी सकाळी ७ वाजता पहिली नमाज अदा केली. यावेळी मुस्लीम बांधवांनी कोल्हापूर, सांगली व सातारा येथे आलेल्या महापुराचे संकट दूर व्हावे यासाठी प्रार्थना केली.
यावेळी जमात-ए-ईस्लामी-हिंद या संघटनेने कोल्हापूर, सांगली व सातारा येथील पुरग्रस्तांसाठी मदतनिधी देण्याचे आवाहन केले. जमा झालेला निधी शासनाच्या सहाय्यता निधीला देण्यात येणार आहे. यावेळी हजारो मुस्लीम बांधव या ठिकाणी नमाज अदा करण्यासाठी उपस्थित होते. त्यांना सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी यावेळी केले. यावेळी माजी नगरसेवक एस .ए.खान हे देखील उपस्थित होते.