पालघर (वाडा) - जिल्ह्यातील वाडा तालुक्यात रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे नद्यांना पूर परिस्थिती होती. तर पिंजाळ नदीच्या पुरात मलवाडा येथील पुल वाहून गेला होता. मात्र, सोमवार सकाळपासून पावसाचा वेग मंदावला आहे. सध्या रिमझिम पाऊस सुरु असून अधूनमधून एखादी सर कोसळत आहे.
पावसाच्या कहराने जिल्ह्याला चांगलेच झपाटले असून रविवारी झालेल्या पावसात वाडा तालुक्यातील वैतरणा, पिंजाळ आणि तानसा या नद्यांनी रौद्ररूप धारण केले होते. तानसा नदीच्या पुराचा फटका निंबवली-केळठण गावातील नदी काठच्या गावपाड्यांना बसला होता. तर, पिंजाळ नदीच्या पुराने मलवाडा पुल वाहून नेला. तसेत पाली येथील आयटीआय व आदिवासी आश्रमशाळेच्या इमारतीलाही या नदीच्या पुराचा तडाखा बसला होता. वैतरणा नदीच्या पुरामुळे बोरांडे गावातील 15 घरांना पाणी शिरल्याने त्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
अगोदरही काही वर्षांपूर्वी मनोर गावाला पुराचा फटका बसला होता. सध्या सोमवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु असून अधूनमधून एखादी सर कोसळत आहे. तर, पावसाचा जोर कमी झाल्याने नद्यांचा पुर काही ठिकाणी ओसरला आहे.