पालघर : जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात ( Tribal remote areas of Palghar district ) पुन्हा एकदा हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मोखाडा तालुक्यातील मुकुंदपाडा ( Mukundpada In Mokhada Tahsil ) येथे गावाला जोडणारा रस्ता नसल्याने गरोदर महिलेला डोलीत घेऊन चार किलोमीटरची पायपीट ( Pregnant Woman Carried In Doli ) करणाऱ्या कुटुंबाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात आरोग्य व्यवस्था आणि दळणवळणाच्या साधनांचा अभाव यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
रस्ता नसल्याने डोलीतून गरोदर महिलेला दाखल करण्यात आले रुग्णालयात : मोखाडा तालुक्यापासून ४० किलोमीटर अंतरावर डोंगरात मुकुंदपाडा वसलेला असून या गावातील दुर्गा मनोहर भोये या पाच महिन्याच्या गरोदर महिलेच्या पोटात बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक असह्य वेदना सुरू झाल्या. मात्र गावाला जोडणारा मुख्य रस्ता नसल्याने रस्त्यापर्यंत नेण्यासाठी गरोदर महिलेच्या कुटुंबाला चार किलोमीटर पायपीट करावी लागली. त्यानंतर या महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : मोखाडा येथील या घटनेमुळे पुन्हा एकदा घटनेमुळे मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पालघर जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील भीषण वास्तव समोर आले आहे. यापूर्वी देखील पालघर जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात आरोग्य व्यवस्था आणि दळणवळणाच्या साधनांचा अभाव असून, अनेकवेळा गरोदर महिलांचे असे हाल झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. प्रशासनाची अनास्था आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचे अशा घटनांमधून वारंवार दिसून येत आहे.