पालघर - ओएलएक्स या सोशल मीडियाद्वारे कॅमेरे भाडे तत्वावर घेऊन विक्री व त्याकामी बनावट नाव, आधारकार्ड बनवून फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून लाखो रुपयांचे 16 कॅमेरे, 9 लेन्स जप्त केले आहेत.
हेही वाचा - विरारमध्ये महामार्गालगतच्या रासायनिक कचऱ्याला भीषण आग
बाभोळा नाका येथील मधूबन बंगलो स्कीममधील अरमान बंगलोत राहणारे फोटोग्राफर कमलप्रित रेखी (वय 28) याची फसवणूक झाली होती. 22 मार्चला आरोपी योगेश चव्हाण व रिक्षाचालक दत्तात्रय भोसले या दोघांनी तीन दिवसांसाठी 3 लाख 15 हजार रुपये किंमतीचा कॅमेरा रेखी यांच्याकडून भाड्याने घेतला होते. त्यानंतर कॅमेऱ्याचा अपहार करून फसवणूक केल्याची तक्रार रेखी यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमने तांत्रिक मदत व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवली. आरोपी हा वेगवेगळ्या राज्यात भटकंती करून राहत असल्याने त्याचा शोध घेणे कठीण झाले होते. पोलीस आरोपीच्या शोधात होते. आरोपी आग्रा येथून मुंबईत कॅमेरा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी सापळा रचून आरोपीला अटक केली.
आरोपीचे मूळ नाव सिद्धेश सुनील महाले असून त्याने ओरिसा येथून विना कागदपत्रे सिमकार्ड घेऊन ओएलएक्सवर अकाऊंट बनवले होते. त्याद्वारे कॅमेरे भाडेतत्वावर घेऊन ते इतरांना विकत असल्याची कबुली पोलीस चौकशीत त्याने दिली आहे. बनावट आधारकार्ड व कॅमेऱ्यांचे बिल बनवून फसवणुकीसाठी वापरत असल्याचेही त्याने सांगितले. आरोपीने फसवणुकीसाठी वापरलेले सिद्धेश सुनील महाले उर्फ कार्तिक तिहारू पटेल उर्फ योगेश वासुदेव चव्हाण उर्फ नवनीत मोहन नायल उर्फ विक्रांत महादेव शेडगे इत्यादी नावांचे बनावट आधारकार्डही पोलिसांना सापडले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून मुंबई, ठाणे, नागपूर, बारामती, पुणे, सुरत, गुजरात, रायपूर, छत्तीसगड इत्यादी ठिकाणी ओएलएक्सवरून विक्री केलेले अंदाजे 25 लाख 6 हजार रुपये किंमतीचे 16 कॅमेरे, 9 लेन्स जप्त करण्यात आले आहेत. तसेच, मोबाईल आणि लॅपटॉपही जप्त करण्यात आला आहे. अंधेरी व नवी मुंबई पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले आहे. आरोपीने नऊ ठिकाणी कॅमेरे चोरल्याची कबुली दिली असून तीन दिवस आरोपी पोलीस कोठडीत असल्याची माहिती माणिकपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आहेर यांनी दिली.
हेही वाचा - मच्छिमारांना तत्काळ अर्थसहाय्य द्या, कोळी युवाशक्तीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी