पालघर- ३ मे नंतर राज्यातील कन्टेनमेंट (प्रतिबंधीत) भाग सोडता सर्व झोन्समधील दारूची दुकाने उघडण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. मात्र, जिल्ह्यात दारूची दुकाने उघडण्याचा आदेश जारी करण्यात आलेला नाही. परंतु, आज (सोमवार) दारूची दुकाने उघडल्या जणार आहे, या अफवेमुळे तळीरामांनी वसई विरार भागातील दारूच्या दुकानांसमोर गर्दी केली. त्यामुळे, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.
मागील दिड महिन्यापासून बंद असलेली दारूची दुकाने आज उघडणार आणि इतक्या दिवसाचा कोरडा घसा आज ओला होईल, या आशेने वसई विरारमधील बहुतांश दारूच्या दुकानांवर आज गर्दी पाहायला मिळाली. मात्र, लोकांनी गर्दी केल्याने सामाजिक अंतराचे पालन झाले नाही. ही गर्दी पांगवण्यासाठी शेवटी पोलिसांना मध्यस्थी उतरावे लागले. पोलिसांनी रांगेत उभ्या असलेल्या लोकांना पळवून लावले. या नंतर दुकानदारांनी दारूची दुकाने उघडली जाणार नाहीत असे फलक लावले. यामुळे तळीरामांची पूर्णतः निराशा झाली.
हेही वाचा- प्राथमिक आरोग्य केंद्रांना पीपीई कीटचे वाटप; राजेंद्र पाटलांचा पुढाकार