पालघर - दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे, वसई-विरार शहरात बाजारपेठाही सजल्या आहेत. परंतु, यावर्षी करोनाचे संकट असल्याने बाजारात विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी आहे. त्यामुळे, व्यावसायिक वर्ग चिंतेत सापडला आहे.
वसई-विरार शहरात विक्रेत्यांनी दिवाळीसाठी लागणारे आकाश दिवे, विविध आकाराच्या पणत्या, रांगोळी, सजावटीचे साहित्य विक्रीसाठी आणले आहे. दरवर्षी गजबजलेल्या बाजारपेठेत यंदा ग्राहकांची गर्दी कमी आहे. दिवाळीच्या आठवडाभर आधीपासूनच ग्राहक बाजारात आकाश दिवे, फराळ साहित्य, रांगोळी, कपडे व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी येतात. परंतु, यंदा अवघ्या चार ते पाच दिवसांवर दिवाळी आहे. तरीही बाजारात येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमीच आहे. अनेक दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात माल विक्रीसाठी आणला आहे. त्यामुळे, माल खरेदीसाठी जितके पैसे टाकलेत किमान तितके तरी पैसे मिळावे, अशी अपेक्षा विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
कमी खरेदीला कोरोना कारणीभूत
यावर्षी करोनामुळे झालेल्या टाळेबंदीमुळे अनेकांच्या हातचे रोजगार गेले. त्यामुळे, ग्राहकही खर्च करण्यास फारसे तयार होत नाहीत. त्यामुळे, ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद कमी आहे. आकाश कंदील विक्रीतून दोन पैसे हाती येतील म्हणून माल विक्रीसाठी घेऊन बसलो आहोत. परंतु, दरवर्षीपेक्षा यंदा ग्राहकांची गर्दी कमी आहे. पुढच्या तीन-चार दिवसात माल विक्री होईल, अशी आशा आकाश कंदील विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
फटाके विक्रेत्यांसमोर पेच
करोनामुळे फटाके विक्री करण्यास शासनाची परवानगी आहे, की नाही याबाबत अनेक फटाके विक्रेत्यांसमोर संभ्रम निर्माण झाला आहे. दरवर्षी दिवाळी निमित्ताने अनेक फटाके व्यावसायिक फटाक्यांची दुकाने लावतात. परंतु, फटाके विक्रीबाबत अजूनही योग्य तो निर्णय मिळत नसल्याने माल विकावा की नाही असा पेच फटाके विक्रेत्यांपुठे निर्माण झाला आहे.
हेही वाचा- गुजरातच्या उंबरगावातील बेपत्ता व्यापाऱ्याचा मृतदेह आढळला कुर्झे धरणात