पालघर - वर्षभराआधी मुलगी हरविल्याची तक्रार तिच्या आईवडिलांनी बोईसर पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र, तक्रारीनंतरही मुलीचा शोध लागत नसल्याने मुलीच्या आई-वडिलांनी गेल्या तीन दिवसांपासून पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण सुरू केले होते. मात्र बुधवारी आईची प्रकृती खालावल्यामुळे तिला पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हरवलेल्या मुलीचे नाव अनिता असून, विठ्ठल नारायण थोरात आणि सखुबाई विठ्ठल थोरात हे आई-वडील आहेत.
आपल्या मुलीला न्याय मिळावा. तसेच तिचा पती संदीप खिल्लारे याच्या विरोधात तक्रार नोंदवावी. तत्कालीन बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कदम व उपविभागीय पोलीस अधिकारी फतेह सिंग पाटील (आता सेवानिवृत्त) यांनी या प्रकरणात हलगर्जी केल्यामुळे त्यांची चौकशी करावी. या मागणीकरिता अन्नत्याग उपोषणाला बसले.
वडील विठ्ठल नारायण थोरात व आई सखुबाई विठ्ठल थोरात हे हिंगोली जिल्ह्यातील नागनाथ येथाल रहिवासी असून विठ्ठल थोरात यांनी आपली मुलगी अनिता हिचे लग्न संदीप खिल्लारे याच्यासोबत लावून दिले होते. संदीप नोकरीच्या शोधात मुंबईत आपल्या बहिणीकडे आला. नंतर पालघर तालुक्यातील बोईसर येथे पत्नी अनितासोबत वास्तव्य करू लागला. बोईसर येथे वर्षभर राहिल्यानंतर एके दिवशी संदीपने अचानक फोन करून अनिता गेल्या तीन-चार दिवसांपासून हरवली असल्याचे अनिताच्या आई-वडिलांना सांगितले. त्यानंतर 2018 पासून आजपर्यंत अनिताचे आई-वडील तिच्या शोधात फिरत आहेत.
पत्नी अनिता भाजी-पाला आणण्यासाठी बाजारात गेली असताना तिथून ती हरवल्याची तक्रार पती संदीप खिल्लारेनी बोईसर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावेळी बोईसर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकपदी कदम हे कार्यरत होते. मुलगी हरविल्याची तक्रार अनिताच्या आई-वडिलांनीही वारंवार केली. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही.
मुलगी हरविल्याची तक्रार घेऊन अनिताचे आई-वडील तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी फत्तेसिंग पाटील यांच्याकडे गेले. न्याय मिळवून देण्यासाठी निवेदन केले. तसेच आपल्याला वेळोवेळी गावाकडून येणे शक्य नाही व आमच्याकडे तेवढे पैसेही नसल्याचे सांगितले. पाटील यांनी त्यांना न्याय न देता नोकरी देतो, असे सांगितले. व आपल्या मूळगावी (सातारा) असलेल्या उसाच्या मळ्यात कामासाठी पाठवले. तिथे विठ्ठल व सखुबाई हे दोघेही दांपत्य त्या 20 एकरी उसाच्या मळ्यात उसतोडीचे काम करीत होते. चार महिने काम केल्यानंतरही त्यांना त्यांची मजुरी दिली गेली नाही. त्यानंतर फतेह सिंग पाटलांच्या मुकादमाला वारंवार फोन केल्यानंतर त्यांनी फक्त चार हजार रुपये आमच्या खात्यात टाकल्याचे विठ्ठल यांनी सांगितले. पैसे मिळत नसल्याने या दाम्पत्याने पाटील यांच्या उसाच्या मळ्यातून पळ काढला.
बोईसर येथे जावई संदीप यांच्या खोलीवर असताना विठ्ठल यांना रक्ताने माखलेले शर्ट व रुमालही सापडला होता, ही बाब त्यांनी पोलिसांना कळवली. अनिता हिचा खून तर झाला नाही ना, हे तपासण्यासाठी पोलिसांनी तो शर्ट व रुमाल ताब्यात घेतला होता. मात्र, त्याचा तपासणी अहवाल काय आहे हे अनिताच्या आई वडिलांना सांगण्यात आलेले नाही.
अनेक तक्रारी केल्यानंतरही त्यांना कोणीही दाद देत नाही, आश्वासनाच्या खैरातीशिवाय त्यांच्या हाती काही लागले नाही. त्यामुळे आपली मुलगी मिळत नसल्याच्या निषेधार्थ तसेच आपल्याला मुलीच्या बेपत्ता प्रकरणाचा छडा लावून देण्याची मागणी त्यांनी केली असून याप्रकरणी हलगर्जी करणारे पोलीस उपविभागीय अधिकारी फत्तेसिंह पाटील, पोलीस उपनिरीक्षक कदम यांची चौकशी करावी व आपल्याला न्याय मिळावा या मागणीसाठी आणि त्याचे आई-वडील उपोषणाला बसले. मात्र बुधवारी आई सखुबाई विठ्ठल थोरात यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.