पालघर /विरार - बंद असलेली देवळे आणि मंदिरे तत्काळ उघडण्यात यावीत आणि आपली ही आर्त हाक सरकारला ऐकू जावी; यासाठी विरार-खानीवडे येथील शिव मंदिराच्या एका पुजाऱ्याने तब्बल २१ दिवस 'खडी तपश्चर्या' करण्याचा निर्णय घेतला आहे. योगी श्री शिवनाथ असे या पुजाऱ्याने नाव आहे. आज त्यांच्या तपश्चर्येचा दुसरा दिवस आहे.
विशेष म्हणजे आपल्या या 'खड्या तपश्चर्ये'दरम्यान हे पुजारी एका पायावर उभे राहताना या २१ दिवसांत केवळ फलाहार घेणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून मंदिरेही बंद ठेवण्यात आली आहेत. राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असली तरी मात्र मंदिर उघडण्याची चिन्हे नाहीत. बंद असलेली ही देवळे आणि मंदिरे तत्काळ उघडण्यात यावीत; यासाठीच आपण हे महत्प्रयास करत असल्याचे या पुजाऱ्याचे म्हणणे आहे.
![पालघर विरार योगी श्री शिवनाथ तपश्चर्या न्यूज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pal-01-rtu-deul-bandh-to-sadhu-and-pujari-byet-vis-mhc10003_06102020080316_0610f_1601951596_742.jpeg)
हेही वाचा - ..असे बेजबाबदार गृहमंत्री आम्ही आयुष्यात पाहिलेले नाहीत - अतुल भातखळकर
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली सर्वधर्मीय मंदिरे उघडण्यात यावीत, यासाठी विविध राजकीय पक्षांनी आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधले होते. नागरिकांच्या श्रद्धसोबतच मंदिर आणि मंदिरांसभोवतीच्या व्यावसायिकांची होणारी उपासमार लक्षात घेऊन ही मंदिरे उघडण्यात यावीत, यासाठी मोठ्या प्रमाणात 'घंटानाद' आंदोलने करण्यात आली होती; मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता; सरकारने या मागणीला अनुमती दिली नव्हती.
'देऊळ बंद'ची थेट झळ मंदिरांतील साधू आणि पुजाऱ्यांनाही बसताना दिसत आहे. बंद असलेली ही देवळे आणि मंदिरे तत्काळ उघडण्यात यावीत आणि आपली ही आर्त हाक सरकारला ऐकू जावी; यासाठी विरार-खानीवडे येथील शिव मंदिराचे पुजारी योगी श्री शिवनाथ यांनी तब्बल २१ दिवस 'खड़ी तपश्चर्या' करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या या तपश्चर्यायुक्त अनोख्या आंदोलनातून हा पुजारी सरकारचे लक्ष आपल्या मागणीकडे वेधणार आहे.
हेही वाचा - धक्कादायक..! महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक असुरक्षित