पालघर - पर्यटन म्हटले की हौसे-मौजचे ठिकाण, मग तो सागर किनारा असो किंवा उंच ठिकाणचा डोंगरमाथा. रोजच्या धकाधकीच्या जीवनातील शीन घालवण्यासाठी आपण पर्यटक म्हणून इतरत्र जात असतो. पर्यटन स्थळ हे त्या विशिष्ट परिसराची आणि जिल्ह्याची ओळख असते. त्यामुळेच वाडा तालुक्यातील पुरातन मंदिरांचा आणि किल्ले कोहजचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.
पालघर जिल्ह्याला वसई ते डहाणूपर्यंत मोठा सागरी किनारा लाभला आहे. विरारमधील जीवदानी माता मंदीर, डहाणूतील महालक्ष्मी मंदिर अशी प्रसिद्ध मंदिरं येथे आहेत. कोहज किल्ला येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. तरीही या किल्ल्याचा संर्वधन आणि पर्यटन विकास मात्र रखडला आहे. येथे पर्यटन विकास झाला तर स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होतील.
हेही वाचा - B'Day Special : बारामतीकारांनी अनुभवलेले शरद पवार...
वाडा शहरात पुरातन पांडवकालीन मंदीर आहे. पुरातत्त्व खात्याने हे मंदीर संरक्षित स्मारक म्हणून घोषितही केलेले आहे. याशिवाय खंडेश्वर, नागदेवता, शनिदेवता, यम आणि यमी आणि पांडवकालीन दगडी चूल आहे. या पांडवकालीन पुरातन वास्तू काळाच्या ओघात भग्नावस्थेकडे जात आहेत. गारगाव धाकेदा या गावातही रामेश्वराचे पुरातन मंदिर आहे. तेथेही गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून वार्षिक उत्सव होत असतो, असे ग्रामस्थ सांगतात.
गुंज येथे डोंगरमाथ्यावर बाल्यावस्थेतील परशुरामाचे मंदिर आहे. याच परिसरात तलावाच्या ठिकाणी एका मंदिराचे भग्नावशेष पहायला मिळतात. परशुराम मंदिर आणि या ठिकाणी असलेले वज्रेश्वरी देवीचे मुळ उगमस्थानाचे स्थळ हे अविकसित आहे.
उत्तर-दक्षिण दिशेने वैतरणा नदीपात्रात तिलसेश्वराचे शिवलिंग आहे. या मंदिर परिसरात महाशिवरात्रीला मोठी गर्दी होत असते. या घाटावर दशक्रीया विधी केले जातात. घाटावर बसण्यासाठी आणि विधीसाठी मंडपाची व्यवस्था लोक देणगीतून केली आहे. पालघर जिल्ह्याला असा समृद्ध पुरातन वास्तूंचा वारसा लाभलेला आहे. या सर्व ठिकाणांचा पर्यटन स्थळे म्हणून विकास व्हावा, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.