पालघर - कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पालघर रेल्वे स्थानकात रेल्वे डब्यांमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. या सेंटरला विशेष प्रतिसाद न मिळाल्याने ती रेल्वे पुन्हा वलसाडला पाठविण्यात आली आहे. २२ दिवसांच्या मुक्कामात अवघ्या ४ कोरोना रुग्णांनी या रेल्वे कोविड सेंटरचा लाभ घेतला. त्यामुळे गाडीच्या व्यवस्थापनावर झालेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे केली होती रेल्वे कोविड सेंटरची मागणी -
पालघरमधील लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन तसेच प्रवासी संघटनांनी मागील काळात प्राणवायूची आवश्यकता होती. त्यामुळे जिल्ह्यात सुविधा नसल्याने या गाडीची मागणी रेल्वेकडे केली होती.
अत्यल्प प्रतिसादने रेल्वे कोविड सेंटर बंद -
पालघर रेल्वे स्थानकात रेल्वे कोविड सेंटर सुरु करण्यात आले. मात्र रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर उभी करण्याचा निर्णय त्रासदायक ठरत असल्याचे दिसून आले. परिणामी विलगीकरण सुविधा असणाऱ्या २३ डब्यांच्या गाडीमध्ये फक्त ४ रुग्णांनी त्याचा लाभ घेतल्याचे आढळून आले. जिल्ह्यात व पालघर तालुक्यात वेगवेगळ्या कोरोना काळजी केंद्रांमधील ५० टक्के खाटा रिकाम्या झाल्या आहेत. या गाडीकडे अत्यल्प प्रतिसाद पाहता सेवा व त्या अनुषंगाने केलेला करारनामा समाप्त करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. पालघर रेल्वे स्थानकात असलेली ही रेल्वे कोविड सेंटरची रेल्वेगाडी गुजरात राज्यातील वलसाड रेल्वे स्थानकाकडे रवाना झाली.
हेही वाचा - मुंबईकरांना दिलासा! 1 जूनपासून सम विषम पद्धतीने दुकाने उघडणार