पालघर - नगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने कोरोना संसर्ग अधिक वाढू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून 2 मे पर्यंत पालघर नगरपालिका क्षेत्र पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालघर शहरात सोमवारी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर रुग्ण राहत असलेला आसपासचा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालघरमधील नागरिकांना वारंवार घराबाहेर पडू नका, अशा सूचना दिल्यानंतरही नागरिक भाजीपाला, किरणा दुकाने सुरू असल्याने या ठिकाणी विनाकारण गर्दी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती आहे.
दरम्यान, पालघर नगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग अधिक वाढू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय पालघर नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. मेडिकल वगळता भाजीपाला, किराणा दुकानांसह सर्वच दुकाने आजपासून (बुधवार) 2 मे पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. या कालावधीमध्ये सकाळी 8 वाजल्यानंतर शहरांमध्ये मेडिकल शिवाय इतर कोणत्याही आस्थापना सुरू राहणार नाहीत.