पालघर - जिल्ह्यातील एडवण येथील भाचीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या काकाला पालघर जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सोबतच या गुन्ह्यात साथ देणाऱ्या मावशी आणि आजीला देखील १० वर्ष कैद आणि रोख दंडाची शिक्षा सुनावली आहे.
अरविंद महादेव पाटील (वय ४५ वर्ष) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी शिकण्यासाठी आजी भानुबाई, मावशी मनीषा आणि काका अरविंद यांच्याकडे एडवण-डोंगरे येथे राहायला आली होती. त्यावेळी ती ५ व्या वर्गात शिकत होती. घरी एकटी असल्याचा फायदा घेऊन तिच्या काकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर त्याने २०१३ ते २०१४ च्या दरम्यान तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर सातत्याने अत्याचार करीत होता. तिची मावशी व आजी यांना घडलेला प्रकार समजला. त्यानंतर त्यांनी त्याला समजावले. मात्र, तरीही त्याने भाचीसोबत हे दुष्कृत्य सुरू ठेवले. यातून मुलगी गर्भवती राहिली. ६ महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर काका, मावशी व आजी यांनी मुलीच्या आई-वडिलांना ही बाब न सांगता संगनमताने तिला विविध डॉक्टरांकडे उपचारार्थ फिरवत होते. यादरम्यान गरोदरपणाचे महिने पूर्ण होण्याच्या आधी ती प्रसूत झाली. त्यापासून तिला जन्मला आलेले बाळ शारीरिक कमकुवत असल्याने ते मृत पावले.
पीडित मुलीच्या आई-वडिलांना ही घटना कळताच त्यांनी पोलिसात धाव घेत याप्रकरणी केळवा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीवरून या तिघांवर गुन्हा दाखल झाला. त्याअनुषंगाने तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. आर. सावंत यांनी सरकारी वकील दीपक तरे यांच्यामार्फत पालघर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
गेल्या ४ वर्षांत याप्रकरणी न्यायालयात अनेकवेळा सुनवणी झाली. या प्रकरणातील १५ साक्षीदार तपासल्यानंतर त्यांची साक्ष व पोलिसांच्या सबळ पुराव्याच्या आधारे अखेर या गुन्ह्यातील आरोपी अरविंद पाटील व त्याला साथ देणारी आजी भानुबाई व मावशी मनीषा यांना न्यायालयाने दोषी ठरवले. पालघर जिल्हा न्यायालय स्थापनेपासून लैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षा सुनावण्याचा हा पालघरमधील पहिलाच व ऐतिहासिक निकाल असल्याचे सरकारी वकील दीपक तरे यांनी म्हटले आहे.