पालघर Palghar Accident : पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. येथे एका कारनं विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात तीन जण ठार झाले असून दोन जण जखमी आहेत. धावत्या कारनं रस्ता दुभाजक ओलांडून ट्रकला धडक दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
कार मुंबईहून अहमदाबादला जात होती : पाच प्रवासी असलेली ही कार मुंबईहून गुजरातमधील अहमदाबादच्या दिशेने जात होती. दरम्यान सकाळी ६.३० वाजता जिल्ह्यातील सातिवली गावाजवळ हा अपघात झाला. वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम रणवरे यांनी ही माहिती दिली. कार रस्ता दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूच्या लेनमध्ये गेली. तिथं विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकनं तिला जोरदार धडक दिली, असं त्यांनी सांगितलं.
कारमधील तीन प्रवासी जागीच ठार : या भीषण अपघातात कारमधील तीन प्रवासी जागीच मृत्यू पावले, तर अन्य दोन जण जखमी झाले. अपघातात वाहनाचं बरंच नुकसान झालंय. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
शिरुर तालुक्यात टेम्पो आणि कारची समोरासमोर धडक : दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात अशाच प्रकारचा अपघात झाला होता. येथे एका टेम्पो आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातानंतर दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला. अपघाताचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.
हेही वाचा :