पालघर - ठाकरे सरकारने कोविड दरम्यान विविध घोटाळे केले आहेत. या घोटाळ्याचा एक भाग म्हणजे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील रीव्हेरा कोरोना हॉस्पिटलमध्ये नवीन ऑक्सिजन प्लांट बसविण्यात आला आहे. तो इंस्टॉल आहे, पण तो सुरू नाही. राज्यात असे 15 ठिकाणी असलेले ऑक्सिजन प्लांट एका ठेकेदारकडून बसविण्यात आले अजून ते इंस्टॉल नाहीत. त्यामुळे राज्यात कोरोना काळात 100 कोटींचा ऑक्सिजन प्लांट घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी केला. ते विक्रमगड येथील रिव्हेरा कोविड हॉस्पिटलमध्ये आले असता पत्रकारांशी बोत होते.
किरीट सोमैय्या यांनी केली रुग्णालयाची पाहणी -
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील देहर्जे येथे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी एका इमारतीत कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयात आज भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णाच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच या रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट सुरू नाही, असे त्यांच्या निदर्शनास आले. राज्यात अनेक ठिकाणी सेंट्रलाइज ऑक्सिजन टॅंक सिस्टीम उभारण्यात आली आहे. परंतु ही सिस्टीम वेळेत सुरु न झाल्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण गेले, तर असंख्य रुग्णांचे अवयव निकामी झाले, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
बुलेट ट्रेनबाबत दिशाभूल -
राज्य सरकार बुलेट ट्रेनला विरोध दर्शवत असल्याचे दाखवते. परंतु पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडून बुलेट ट्रेनसाठी जमीन संपादनाचे काम सुरू असून ते थांबवण्याचे कोणतेही प्रायोजन नसल्याचे सांगत, उद्धव ठाकरे हे बुलेट ट्रेनला विरोध असल्याचे भासवून सामान्य जनतेची दिशाभूल का करत आहे, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच हे माफियाचे सरकार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा - मुंबईत कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसकडे लाभार्थ्यांनी फिरवली पाठ