पालघर - विरार पूर्व कुंभारपाडा येथे मोबाईल दुकानावर बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी दुकानमालक व त्याच्या मेव्हण्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात मालक विशाल गुप्ता यांचा मृत्यू झाला असून विजयकुमार गुप्ता हे जखमी झाले आहेत. रिद्धी सिद्धी मोबाईल अँड स्टेशनरी असे त्या दुकानाचे नाव आहे.
हेही वाचा - '...तर शिवसेनेने काँग्रेसच्या पाठिंब्यावरील सरकार बरखास्त करावे'
विरारमध्ये झालेल्या या गोळीबारामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. कुंभारपाडा येथील रिद्धी सिद्धी मोबाईल अँड स्टेशनरीच्या दुकानात रविवारी रात्री १० वाजता दुचाकीवरून दोन चोरटे चोरी करण्याच्या उद्देशाने तोंडाला रुमाल बांधून गुप्ता यांच्या दुकानात शिरले. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून दुकानाचे शटर आतल्या बाजूने खेचून दुकान बंद करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, विजयकुमार व विशाल गुप्ता या दोघांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत एका चोरट्याने त्याच्याजवळ असलेल्या गावठी कट्यातून विशाल व विजयकुमार या दोघांवर तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी विशाल गुप्ता यांच्या छातीत लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, एक गोळी विजयकुमार यांच्या पायाला लागली.
हा प्रकार बघून आरडाओरड ऐकताच स्थानिकांनी मोबाईलच्या दुकानावर धाव घेतली व चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान एक चोरटा दुचाकी तिथेच सोडून पळून जाण्यात यशस्वी झाला असून त्याचा शोध सुरू आहे. तर, दुसऱ्या चोराला संतप्त नागरिकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.