पालघर : विरारच्या एका ज्वेलर्सला अर्धा किलो सोने देण्याच्या बहाण्याने गंडा घालणाऱ्या तीन आरोपींपैकी एका आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिटने उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. चंदन सिंग असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करून त्याला अर्नाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, विरारच्या तिरुपतीनगरमधील पूनम आस्था या इमारतीत कैलास राठोड यांची अर्धा किलो सोने विकण्याच्या बहाण्याने ३१ जानेवारीला मुंबईवरून आलेल्या तिघांनी १५ लाखांची फसवणूक केली होती. या प्रकरणी तक्रार आल्यानंतर अर्नाळा पोलीस ठाण्यात २ फेब्रुवारीला गुन्हा दाखल केला होता. यातील एक आरोपी यूपी राज्यातील प्रतापगड येथे असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट-२ च्या अधिकाऱ्यांना मिळाली होती, त्याआधारे प्रतापगड येथे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जाऊन आरोपी चंदन सिंह याला पकडण्यात आले. सध्या या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.