वसई (पालघर) - गुरुवारी ८४ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ८४५ झाली आहे. तर उपचारादरम्यान ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, त्याच वेळी दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात १२० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच आतापर्यंत एकूण ७२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. क्षेत्रात आतापर्यंत १०७४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर उर्वरित ६९९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्याची परिस्थिती -
राज्यात गुरुवारी १ हजार ६७२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ६० हजार ८३८ झाली आहे. गुरुवारी एका दिवसात कोरोनाच्या ३ हजार ७५२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५३ हजार ९०१ रुग्णांवर (अॅक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यातील रुग्णवाढीचा वेग झाला कमी -
राज्यातील रुग्ण वाढीचा वेग कमी होत असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढत आहे. सध्या हा कालावधी सुमारे २६ दिवसांवर गेला आहे. तर राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.४९ टक्के एवढा आहे.