वसई-विरार (पालघर) - वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. गुरुवारी वसई-विरारमध्ये एका दिवसात 301 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. गुरुवारी दिवसभरात उपचारादरम्यान 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यशस्वी उपचारानंतर 117 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 9 हजार 61 वर पोहोचली आहे. वसई विरारमध्ये आतापर्यंत एकूण 179 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. पालिका क्षेत्रात आतापर्यंत 6 हजार 118 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 2 हजार 764 कोरोनाबाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान काही दिवसांपूर्वी वसई-विरार महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण शहर लॉकडाऊन करण्याऐवजी, ज्या भागात कोरोनाचे रुग्ण अधिक आहेत. त्याठिकाणी कंटेनमेंट झोन तयार करून पोलिसांच्या मदतीने कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महापालिकेने मोठे प्रतिबंधित क्षेत्रे बनविण्याचे प्रयोग गेल्या दीड महिन्यापासून हाती घेतले होते. या प्रयोगाला यश मिळत असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. यासाठी पालिकेने वसई विरारमध्ये 29 नव्याने मोठे प्रतिबंधित क्षेत्रे तयार केली आहेत.